गणेशाचं पत्र


नमस्कार,
 कसे आहात सर्वजण? खुश आहात ना? माझी आतुरतेने वाट बघताय ना? पण काय त्या कोरोनाने तिकडे संपूर्ण थैमान घातलय म्हणे. त्याच विषयी पत्र लिहिलं आहे. आता पुढील महिन्यात आमचं आगमन होणार. आम्ही दरवर्षी एक महिना आधीच गाड्यांचं रिजरव्हेशन करून ठेवतो. पण ह्या वर्षी कोरोना मुळे गाड्याच बंद आहेत. त्यामुळे अद्याप आम्हाला काहीच रिजरव्हेशन करता येत नाहीये.
 खरं सांगायचं झालं तर आता इतकी वर्षे तुम्हा सर्वांचे प्रेमाने भरलेले मोदक लाडू, गोड गोड जेवण ह्या सगळ्याची आता सवय झाली आहे. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं प्रेम, श्रद्धा, भक्ती हे सर्व पाहता तुम्हाला भेटल्याशिवाय राहवत नाही. म्हणूनच तर मागच्या वर्षी जोरदार पाऊस असूनही आलो होतो. पण ह्या वर्षी गाड्या बंद असल्याने येणं कठीण दिसत आहे. तरी तुमच्यातलेच काही पोलीस आणि डॉक्टर किंवा नर्सेस हे कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मला खरंच ह्या सर्व लोकांचं फार कुतूहल वाटतं. जर कोरोना दूर झाला तर आमच्या गाड्या देखील सुरू होतील आणि आम्हाला येण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचा सहभाग देखील फार महत्त्वाचा आहे. तुम्ही देखील एक सुजाण नागरिक म्हणून घरीच राहून आपल्या पोलीस व आरोग्य कर्मचारी बांधवांना सहकार्य करा. अत्यावश्यक गरज असल्यावरच बाहेर पडा. आणि बाहेर पडल्यावर देखील मास्क आणि सॅनिटाईजर चा वापर करायला विसरू नका. मला तुम्हा सर्वांचीच फार काळजी आहे. आम्हाला ह्या वर्षी सुद्धा तुम्हा सर्वांच्या हातचे मोदक लाडू आणि ते गोड गोड जेवण जेवायचं आहे. पण तुम्ही जर शिस्तीचे पालन करून एका सुजाण नागरिकप्रमाणे नाही वागलात तर मला तुमचं हे प्रेम कसं मिळणार? परिस्थिती फार भीषण आहे. अजूनही वेळ गेली नाही. सर्वांना मिळूनच कोरोनाचा पराभव करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 
 तसं बोलायला तर अजून बरंच आहे. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी जितका वेळ द्यावा तितका कमीच. पण कुठे ना कुठे थांबावं लागणारच ना? तरी सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि शिस्तीचं पालन करा जेणे करून आमच्या देखील गाड्या सुरू होतील आणि आम्हाला तुमच्याकडे येण्यास मदत होईल.

धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

कोरोनाचे पत्र