कोरोनाचे पत्र

नमस्कार!
 काय मग मंडळी, ओळखलंत ना मला? मी तोच जो सध्या तुमच्या जीवावर टिचून बसलेला आहे. मी तोच ज्याला घाबरून तुम्ही लोकांना हात मिळवण्याचं सोडून आजकाल रामराम करत आहात. मी तोच जो चीनमधून पसरत पसरत तुमच्या देशाची वेस ओलांडून आलो आहे. आता तरी ओळखलंत ना?
 खरं तर धमकी द्यायलाच आलो आहे. कृपा करून दूर राहा माझ्यापासून. जर माझ्याशी जवळीक करायला आलात  तर स्वतःचा जीव मला अर्पण करावा लागेल. तसं बघावं तर टेलिकॉम कंपन्या, रेल्वे स्थानक, न्यूज चॅनल्स सर्वच जण तुम्हाला माझ्यापासून दूर राहण्यास सुचवत आहेत. पण त्यातून जरी तावडीत सापडलात तर मात्र काही खैर नाही. आणि मी काही तुमची शेवटची इच्छा वगरे पूर्ण करणार नाही हो. त्यामुळे जराशी सावधानता बाळगाच.
 तसं स्वतःचं कौतुक किंवा मोठेपणा सांगावा म्हणून नाही, पण माझी दहशत एका दहशतवाद्याला देखील लाजवेल इतकी भयंकर आहे बरं का. लगेच आपली एन्ट्री झाली काय अन् लगेच सगळे शाळा, कॉलेज सगळं बंद. मोठमोठ्या कंपन्यांनी देखील मला घाबरून कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. व्वा! काय दहशत आहे आपली. पण एक गोष्ट कळत नाही. ते तुमच्या सैनिक ना पोलीस लोकांना काय माहीत नाही का मी इथे आलोय ते? सगळ्यांना सुट्ट्या दिल्या आहेत. घाबरून घरी बसले आहेत सर्वजण पण हे मात्र बिनधास्त कामं करत आहेत आपलं. चेहऱ्यावर मास्क वगैरे तर दिसतो म्हणजे कल्पना तर असावी माझी. पण माहीत असूनही सरळ सरळ न घाबरता उभे राहिलेत आपले. काय आयर्न मॅन आहेत की काय? ह्या आधी स्वाईन फ्लू नावाचे माझे पूर्वज देखील इथे येऊन गेले होते. त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं. की साले हे ह्यांचे पोलीस ना सैनिक कुठल्या मातीचे बनलेत काय माहीत. हे तर बिनधास्त उभे राहतात न घाबरता.
 खरं तर मी फार क्रूर आहे. ज्या भूमीत जन्माला आलो तिथेच ३००० लोकांचे बळी घेतले मी. पण आज स्वतःच्या जीवाची पर्वा न उभ्या असलेल्या ह्या सर्व राष्ट्रहितचिंतकांना पाहून खरंच काळीज एकदम मायेने भरून आलं. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या अश्या ह्या निडर पठ्ठ्यांमुळेच आज तुमचा देश सुरक्षित आहे. माझा क्रूरपणा तर संपुर्ण जगाने पहिला आहे पण आता माझं प्रेम देखील ह्या तुमच्या राष्ट्रहितचिंतकांपर्यंत पोहोचवा. "सुरक्षित राहा. सर्वांची सुरक्षा करत असताना स्वतःची देखील काळजी घ्या" म्हणून माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
                                              - आपला घातकी,
                                                कोरोना.

Comments

Popular posts from this blog

गणेशाचं पत्र